पंचायत समितीतील गटविकास अधिकारी दालनासमोर आंदोलन; हप्ते जमा करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

प्रतिनिधी | हुजैफा बोहरी

पैठण तालुक्यात रमाई आवास व प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदानाचे हप्ते मिळावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. अनेक महिन्यांपासून घरकुल अनुदानाचे हप्ते प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करत घरकुल लाभार्थ्यांसह गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

पैठण तालुक्यात अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, मंजूर घरकुलांच्या अनुदानाचे हप्ते अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा आंदोलनादरम्यान मांडण्यात आला. थकीत हप्ते तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

२० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दालनासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले, उपसभापती संतोष लघाने आणि विनोद पा. बोंबले यांनी आंदोलकांशी चर्चा करून घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते जमा करण्याबाबत आश्वासन दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना हप्ते वितरणाबाबत निर्देश दिल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. या आश्वासनानंतर कार्यालयातील ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सदस्य बबलूबाई बागवान, शेषराव निकाळजे, भगवानराव बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे शाहीर सुरेश सदावर्ते, उपाध्यक्ष राम मिसाळ, महासचिव अतुल गिरी, दत्ता पाटील वाहुळे, प्रदीप गायकवाड, भानुदास चाबुकस्वार, दीपक गायकवाड, देविदास मिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित हप्ते प्रत्यक्ष जमा होण्याबाबत पुढील कार्यवाहीकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *