सावरगाव वायाळच्या ग्रामसेवकावर जालना एसीबीची कारवाई; मंठ्यातील धनेश्वरी हार्डवेअर येथे रचला सापळा
मंठा | गजानन माळकर पाटील, तालुका प्रतिनिधी
रोजगार सेवकाच्या मानधनाचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना सावरगाव वायाळ (ता. मंठा) येथील ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवकाला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी मंठा शहरातील जालना रोडवरील धनेश्वरी हार्डवेअर येथे ही कारवाई करण्यात आली.
अनिल तुकाराम चव्हाण (वय ४९, व्यवसाय ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक, रा. सावरगाव वायाळ, ता. मंठा) असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
नेमके प्रकरण काय?
एसीबीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, या प्रकरणातील तक्रारदार (वय ३३) हे रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत अधिकारी अनिल चव्हाण यांनी तक्रारदाराला त्यांच्या मानधनाचा २४ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. या धनादेशाच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यावेळी तक्रारदाराने नाइलाजास्तव एक हजार रुपये दिले होते, तर उर्वरित पाच हजार रुपये नंतर देण्याचे सांगितले होते.
त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२६ रोजी चव्हाण यांनी तक्रारदाराला आणखी ४८ हजार रुपयांचा मानधनाचा धनादेश दिला. या धनादेशाच्या मोबदल्यात आठ हजार रुपये आणि यापूर्वीचे बाकी असलेले पाच हजार रुपये, अशी एकूण १३ हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.
पडताळणीनंतर सापळा कारवाई
तक्रारीच्या अनुषंगाने १८ नोव्हेंबर रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी मंठा शहरातील जालना रोडवरील धनेश्वरी हार्डवेअर येथे आरोपी अनिल चव्हाण यांनी तक्रारदाराकडे १३ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अनिल तुकाराम चव्हाण यांना पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. तसेच लोकसेवक अनिल चव्हाण यांना रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी ताब्यात घेण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
एसीबीच्या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गजानन घायवट, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चेके आणि चालक पोलीस हवालदार विठ्ठल कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाचेची मागणी झाल्यास एसीबीशी संपर्क साधा
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक :
- जालना एसीबी : ०२४८२-२२७२५२
- हेल्पलाइन : १०६४
- व्हॉट्सॲप : ९७६४०२१०६४
