समान काम, समान वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; मंठा वकील संघाचा उपोषणाला पाठिंबा
प्रतिनिधी : गजानन माळकर पाटील
न्यायदान प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. समान काम, समान वेतनासह विविध सेवाविषयक मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनांतर्गत मंठा येथील न्यायालयासमोरही कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पाडण्यात वर्ग तीन कर्मचारी, लघुलेखक, बेलिफ तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. दैनंदिन न्यायालयीन कामकाजाचा वाढता व्याप, कामाचा ताण आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना वेतन व सेवाविषयक प्रश्न प्रलंबित असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही समान कामासाठी समान वेतन लागू करावे, ही आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. समान काम, समान वेतनासंदर्भातील प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार मागण्या करूनही ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, मंठा न्यायालयासमोर सुरू असलेल्या या बेमुदत उपोषणाला मंठा वकील संघाने पाठिंबा दर्शविला आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वकील संघाचा पाठिंबा असल्याचे ॲड. सचिन झोल यांनी सांगितले.
या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. कामानिमित्त न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना अपेक्षित कामे वेळेत पूर्ण न झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचेही समोर आले आहे.
यावेळी ॲड. आर. बी. गडदे, ॲड. राजेश खरात, ॲड. डी. एस. लिंबूळकर, ॲड. सुनील मस्के, ॲड. सोहेल पठाण, ॲड. भागवत देशमुख आणि ॲड. मिलिंद मस्के यांच्यासह वकील उपस्थित होते.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि हे आंदोलन किती काळ सुरू राहते, याकडे न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि पक्षकारांचे लक्ष लागले आहे.

