बसस्थानकासमोरील अपघातानंतर कारचालक वाहनासह पसार; पैठण पोलिसांत गुन्हा दाखल
पैठण | प्रतिनिधी
पैठण शहरात मध्यरात्री भरधाव कारने पायी जाणाऱ्या वृद्धाला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिताराम आसाराम गव्हाणे (वय ७५, रा. कहारवाडा, पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता बसस्थानकासमोरील सत्यम भजे-जिलेबी सेंटरजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून वाहनासह निघून गेल्याची तक्रार पैठण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
नेमका अपघात कसा घडला?
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सिताराम गव्हाणे हे पायी कहारवाड्याकडे जात होते. त्याचवेळी पत्रकार भवनाच्या दिशेने येणाऱ्या एमएच १३ ईके ६०३५ क्रमांकाच्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या कमरेला, छातीला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक पसार
अपघातानंतर संबंधित कारचालकाने अपघाताची माहिती न देता वाहनासह घटनास्थळ सोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कारचालकाचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. या घटनेमुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनांच्या वेगाचा आणि रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पैठण पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी मृताचे भाऊ डिंगबर आसाराम गव्हाणे (वय ७०, रा. कहारवाडा, पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८०/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.२४ वाजता गुन्ह्याची नोंद झाली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. तळेकर करीत आहेत.

