अनावश्यक खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत; आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
प्रतिनिधी : हुजैफा बोहरी
पैठण : कृषी उत्पन्न बाजार समिती, पैठणची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेत संचालक मंडळाने अनावश्यक सत्कार समारंभ व इतर खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ५१ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार मदतीचा धनादेश आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध निधीचा सामाजिक उपयोग व्हावा, या उद्देशाने बाजार समितीच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत निधी असून, गरजूंसाठी विविध प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी त्याचा वापर केला जातो.
