सुरळेगाव ते नागझरी दरम्यान नदीपात्र कोरडे; पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर
प्रतिनिधी | मदन भुसारे
कमी पर्जन्यमानामुळे परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सुरळेगावपासून नागझरीपर्यंत गोदावरी नदीपात्रात पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील विविध गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी मौजे नागझरी, खामगाव, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, शहागड, गोरी आणि डोमलगाव आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी राक्षसभुवन फाटा येथे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांची भेट घेतली.
यावेळी उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी मांडली. नदीपात्रात पाणी उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शेतकरी व ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत अमरसिंह पंडित यांनी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासंदर्भात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले.
या प्रसंगी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह विविध गावांचे सरपंच, चेअरमन, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीवर संबंधित पाटबंधारे विभागाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

