कापड मंडई परिसरात कारवाई; ८ हजार २५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त
पैठण | प्रतिनिधी
पैठण शहरातील कापड मंडई परिसरात पैशांवर तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याच्या प्रकरणात पैठण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ८ हजार २५० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता कापड मंडई परिसरातील बाळू पटेल यांच्या घरासमोरील ओट्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी शिवनाथ सिताराम सोनटक्के (वय ५५, रा. लक्ष्मीनगर, पैठण), रईस महेमुद कुरेशी (वय ४५), अयुब इब्राहीम कुरेशी (वय ५८, दोघेही रा. दारुसलाम मोहल्ला, पैठण), नितीन श्रावण खुडे (वय ५२, रा. साळीवाडा, पैठण) आणि ईनाम फसीओद्दीन अन्सारी (वय ५५, रा. चौधरी मोहल्ला, मेन रोड, पैठण) हे विनापरवाना पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश संभाजी तळेकर यांनी फिर्याद दिली. पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड पुढील तपास करत आहेत.
