ग्रंथदिंडी, कविसंमेलन, परिसंवाद आणि गझल मुशायऱ्याने संमेलनाला रंगत; साहित्यिकांचा गौरव

जालना | प्रतिनिधी

जालना येथील डॉ. सुभाषराव ढाकणे शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘अक्षरवैभव’ साहित्य संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने झाली. विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका साकारत सहभाग नोंदवला. लेझीम आणि ढोल-ताशांच्या सादरीकरणामुळे ग्रंथदिंडीला सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.

संमेलनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील गझलकार शेख इक्बाल मिन्ने आणि नांदेड येथील साहित्यिक प्रा. पी. विठ्ठल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून कै. डॉ. सुभाषराव ढाकणे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या अध्यक्षा डॉ. प्रीती वारे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विनायकभैय्या चोथे आणि ॲड. गजानन मांटे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘अक्षरवैभव साहित्य सन्मान’ प्रदान करून साहित्य क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. उद्घाटकांनी साहित्याचे सामाजिक स्थान तसेच गझल आणि काव्याच्या प्रवासाबाबत विचार मांडले.

याप्रसंगी विधी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पवन खरात यांच्या शेती विषयावरील पुस्तकाचे तसेच कवयित्री सुरेखा कुलसे यांच्या ‘मनचाफा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कविसंमेलनाला विद्यार्थ्यांचा सहभाग

संमेलनात आयोजित कविसंमेलनात ललित आधाने, आशा डांगे, महेश मोरे, धम्पाल जाधव, लक्ष्मण खेडकर, सुनील उबाळे, सविता लोंढे, नारायण खरात, बी. शेख, कन्नुलाल विठोरे, धनंजय गव्हाळे आणि अशोक खेडकर यांनी कविता सादर केल्या. मराठी भाषा, साहित्य आणि पर्यावरणाशी संबंधित विषयांवरील कवितांना उपस्थितांकडून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनीही कविसंमेलनाचा आनंद घेतला.

समाजमाध्यमांवरील साहित्य लेखनावर परिसंवाद

‘समाज माध्यमांवरील साहित्य लेखन!’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. प्रा. डॉ. शिवाजी हुसे अध्यक्षस्थानी होते, तर प्रा. डॉ. पंडित रानमाळ प्रमुख उपस्थित होते. प्रा. डॉ. यशवंत सोनूने, प्रा. डॉ. अनिरुद्ध मोरे, प्रा. डॉ. विद्या कुलकर्णी आणि प्रा. डॉ. मारोती घुगे यांनी डिजिटल माध्यमांवरील साहित्य लेखनाबाबत विचार मांडले.

गझल मुशायऱ्याने रंगली मैफल

संमेलनाच्या उत्तरार्धात गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले. योगिराज माने यांनी अध्यक्षपद भूषवले. सहभागी गझलकारांनी विविध गझला सादर केल्या. उपस्थित रसिकांनी सादरीकरणाला दाद दिली.

यानंतर संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी ममता सिंधुताई सपकाळ, डॉ. संदीप ढाकणे (तहसीलदार, मालेगाव), डॉ. प्रदीप हुसे आणि शैलेश राजमाने (नायब तहसीलदार, जालना) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी साहित्यिक उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. सुभाषराव ढाकणे शैक्षणिक संकुलांतर्गत विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल मैंद, कॉम्प्युटर अँड डेटा सायन्सचे प्राचार्य गजानन काकडे, नरसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष ढिल्पे, प्राचार्य पुरुषोत्तम गायकवाड, पार्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पूनम घेडवाल, माऊली महाविद्यालय व माऊली प्रशासकीय सेवा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एम. नागरगोजे आणि प्राचार्य आर. जी. अंबोरे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रंथदिंडी, कविसंमेलन, परिसंवाद आणि गझल मुशायऱ्यामुळे पहिल्या ‘अक्षरवैभव’ साहित्य संमेलनाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *