रेल्वे स्टेशन रोड व गोकुळधाम सहकार कॉलनी परिसरात मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम; पुनः अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा

जालना | प्रतिनिधी

जालना शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेंतर्गत महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) रेल्वे स्टेशन रोड तसेच गोकुळधाम सहकार कॉलनी परिसरात कारवाई केली. या कारवाईत रेल्वे स्टेशन रोड परिसरातील ७० अनधिकृत टपऱ्या आणि गोकुळधाम सहकार कॉलनी परिसरातील तीन अनधिकृत शेड हटविण्यात आल्या.

महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे मनपा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. कारवाईनंतर संबंधित परिसरातील रस्ते व पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांची ये-जा आणि वाहतुकीस सुविधा होण्यास मदत झाल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.

पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई

ज्या ठिकाणी अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण आढळल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार नियमानुसार कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करू नये तसेच टपऱ्या अथवा हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मनपाने नागरिक व व्यावसायिकांना केले आहे.

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई

सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख शोएब खान, कादर खान, आमेर खान, किरण प्रधान, अरुण वानखेडे, श्रावण सराटे आणि सतीश ढक्‍का यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जालना शहरातील प्रमुख मार्गांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *