चोरी, फसवणूक व अवैध व्यवहारांना प्रतिबंधासाठी बैठक; ग्राहकांची ओळख, कागदपत्रे व व्यवहारांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना
प्रतिनिधी : गजानन माळकर
मंठा शहरातील सराफा व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसह चोरी, फसवणूक व अवैध व्यवहारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने मंठा पोलीस ठाण्यात सराफ असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक बुधवारी (३० सप्टेंबर) घेण्यात आली. यावेळी चोरीचे अथवा संशयास्पद स्वरूपाचे सोने-चांदी व इतर मौल्यवान वस्तू खरेदी करू नयेत, अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
दुपारी १२ ते १.२० या वेळेत झालेल्या बैठकीत व्यवहार करताना वस्तू विक्री करणाऱ्या व्यक्तीची ओळख, आवश्यक कागदपत्रे तसेच व्यवहाराची योग्य नोंद ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संशयास्पद व्यवहार किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.
दुकानांच्या सुरक्षेबाबतही सूचना
सराफा दुकानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, दुकानाच्या आतील तसेच बाहेरील परिसराचे स्पष्ट चित्रीकरण होईल याची दक्षता घेणे आणि सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुकानात आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबतही पोलिसांनी मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान सराफ व्यावसायिकांनी पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत व्यवसायातील अडचणी, ग्राहकांकडून होणारे व्यवहार आणि सुरक्षेशी संबंधित मुद्दे मांडले.
दरम्यान, चोरीचा अथवा संशयास्पद स्वरूपाचा मौल्यवान ऐवज खरेदी होऊ नये आणि कोणताही व्यापारी अनावश्यक कायदेशीर अडचणीत येऊ नये, यासाठी व्यवहारांमध्ये आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
बैठकीस मंठा शहरातील सराफ असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
