एमआयडीसी पोलिसांची इसारवाडी येथे वाळू वाहतुकीवर कारवाई; गोदावरी नदीपात्र पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आता पैठणकरांचे थेट आव्हान

पैठण | प्रतिनिधी

पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील इसारवाडी येथे विनारॉयल्टी वाळू वाहतूक करणारा हायवा पकडत एमआयडीसी पैठण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे पाच ब्रास वाळूसह १२ लाख रुपयांचा हायवा असा एकूण १२ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईनंतर आता पैठणकरांकडून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर इसारवाडी परिसरात वाळू वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या निदर्शनास येऊन कारवाई होऊ शकते, तर पैठण शहरालगत असलेल्या गोदावरी नदीपात्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वाळू उपशावर पैठण पोलिसांची कारवाई कधी होणार?

गोदावरी नदीपात्राचा परिसर पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. शहरापासून जवळ असलेल्या नदीपात्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र असताना या प्रकाराकडे पैठण पोलिसांचे लक्ष जाणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या वतीने पैठण शहरातील विविध ठिकाणी तसेच गोल नाका, शहागड फाटा आणि पाचोड फाटा परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

या CCTV यंत्रणेचा उद्देश संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि अनुचित प्रकारांना आळा घालणे हा आहे. मग गोदावरीतून रात्रीच्या वेळी वाळू काढून तिची वाहतूक होत असेल, तर या हालचाली प्रशासनाच्या नजरेत का येत नाहीत, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

हायवा नदीपात्रातून बाहेर येतो, मग तपासणी कुठे होते?

गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा केल्यानंतर संबंधित वाहने शहरातील किंवा शहराबाहेरील प्रमुख मार्गांवरूनच पुढे जातात. त्यामुळे नदीपात्रातून बाहेर पडणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची तपासणी करणे प्रशासनासाठी अशक्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.इसारवाडी येथे एका हायवावर कारवाई झाल्याने पोलिसांची यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता गोदावरी नदीपात्राच्या जवळच नियमित गस्त, रात्रीची तपासणी आणि संशयित वाहनांची तपासणी का केली जाऊ नये? असा प्रश्न पैठणकर विचारत आहेत.

पैठणकरांचे प्रशासनाला थेट आव्हान

गोदावरी नदीपात्रातील वाळू उपशाचा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता न राहता प्रशासनाच्या प्रत्यक्ष कारवाईची कसोटी ठरणार आहे.

एमआयडीसी पोलिसांनी इसारवाडी येथे हायवा पकडला; आता पैठण पोलिसांनी गोदावरी नदीपात्राकडे वळून पाहावे.

नदीपात्रात प्रत्यक्ष पाहणी, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी आणि उपलब्ध CCTV फुटेजची पडताळणी करून वाळू उपशाबाबत वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी पैठणकरांकडून होत आहे.

वाळू उपशासाठी परवानगी किंवा टेंडर नसताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जात असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि असा कोणताही नियमबाह्य प्रकार होत नसल्यास प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देणेही तितकेच आवश्यक आहे.

इसारवाडीपर्यंत जाऊन हायवा पकडण्याची कारवाई होत असेल, तर पैठण शहरालगतच्या गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी प्रशासन आणखी किती दूर जाणार? हा पैठणकरांचा सवाल आता थेट पैठण पोलिसांसमोर आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *