हजारो गणेशभक्त मंत्रमुग्ध; शिवसेना-भाजपाप्रणित गणेश महासंघातर्फे पुरी-भाजी व मानपत्राचे आयोजन

प्रतिनिधी : हुजैफा बोहरी

पैठण येथील प्रथम मानाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार विलासबापू भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष विनोद पा. तांबे, नगराध्यक्ष भूषण काका कावसनकर, सभापती विनोद पा. बोंबले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निमेश पटेल, डीवायएसपी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किशोर तावरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मागील पंच्याऐंशी वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार जैनपुरा येथील शिवशक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मूर्तीची आरती केली. त्यानंतर माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वाजत-गाजत मिरवणुकीत सहभागी करून घेत आरती व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अनिल पटेल यांनी जैनपुरा व कापड मंडई गणेश मंडळांनी सुरू केलेल्या परंपरा पुढील पिढीने कायम ठेवाव्यात, असे आवाहन केले. तसेच यावर्षी कोणतीही निवडणूक नसल्याने गणेशोत्सवात उत्साह काहीसा कमी जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिस पाटील अशोक पाटील, दारूबंदी अधिकारी जयंत पाटील आणि विस्तार अधिकारी दशरथ खरात यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

मुख्य विसर्जन मिरवणुकीत कापड मंडई गणेश मंडळाने ‘झेन जी आंदोलन’ हा जिवंत देखावा सादर केला. या देखाव्याने उपस्थित गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले असून हजारो भाविकांनी देखावा पाहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अमित पटेल, रितेश पटेल, पीयूष पटेल, संजय धोकटे, अंकुश म्हस्के सर, दिनेश माळवे, सोमनाथ दारुणकर, सागर जटाळे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील दहा दिवसांपासून प्रयत्न केले.

दरम्यान, पैठण तालुका शिवसेना-भाजपाप्रणित गणेश महासंघाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी पुरी-भाजी व मानपत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार विलासबापू भुमरे, नगराध्यक्ष विद्याताई भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, शेखर शिंदे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष योगराज बालासिंग बुंदिले, महासंघाचे अध्यक्ष राजू पाटील बोंबले, कुणाल पिंपळे, सुनील काकडे आणि विलास महाराज मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *