काव्य-गझलांची रंगणार मैफल; ममता सपकाळ यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
जालना | प्रतिनिधी
जालना शहरातील साहित्यप्रेमींसाठी पहिले ‘अक्षरवैभव साहित्य संमेलन’ सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) आयोजित करण्यात आले आहे. कै. डॉ. सुभाषराव ढाकणे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना संचलित डॉ. सुभाषराव ढाकणे महाविद्यालय, माऊली प्रशासकीय सेवा महाविद्यालय आणि अक्षरवैभव साहित्य परिषद, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन डॉ. सुभाषराव ढाकणे शैक्षणिक संकुलातील सरस्वती सभागृहात होणार आहे. ‘काव्य-गझलांची’ ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
सकाळी १० ते ११.३० या वेळेत उद्घाटन समारंभ होणार असून प्रसिद्ध साहित्यिक पी. विठ्ठल (नांदेड) हे संमेलनाध्यक्ष राहणार आहेत. प्रसिद्ध गझलकार शेख इक्बाल मिर्झा (छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रीती प्रल्हाद वारे या स्वागताध्यक्ष आहेत.
यावेळी संस्थेच्या सचिव शीलाताई खेडकर आणि सहसचिव अॅड. गजानन मांटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, राम गायकवाड, संजीवनी तडगावकर, संजय खैरे, प्रा. डॉ. यशवंत सोनुने आणि कैलास भाले यांना ‘अक्षरवैभव सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.
कविता, गझल आणि साहित्य चर्चेची मैफल
संमेलनात कविता, गझल, साहित्य चर्चा तसेच समाजमाध्यमांवरील लेखन अशा विविध विषयांवर कार्यक्रम होणार आहेत. साहित्यिक विचार आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित या संमेलनात साहित्यप्रेमी, कवी, लेखक, विद्यार्थी आणि रसिक सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या आयोजनामध्ये अक्षरवैभव साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शशिकांत पाटील, सचिव डॉ. राज रणधीर तसेच डॉ. शरद कवाणकर, प्रशासकीय अधिकारी, कै. डॉ. सुभाषराव ढाकणे शैक्षणिक संकुल यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
तसेच प्रा. विठ्ठल शामराव मैंद, प्राचार्य, डॉ. सुभाषराव ढाकणे विधी महाविद्यालय, प्रा. गजानन काकडे, प्राचार्य, डॉ. सुभाषराव ढाकणे कॉम्प्युटर अँड डेटा सायन्स महाविद्यालय आणि डॉ. ऋषिंधर अंभोरे, प्राचार्य, माऊली प्रशासकीय सेवा महाविद्यालय यांचाही आयोजनात सहभाग आहे.
समारोप सत्रात ममता सपकाळ यांची उपस्थिती
दुपारच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप ढाकणे, तहसीलदार, मालेगाव, जि. नाशिक राहणार असून ममता सपकाळ, सुप्रसिद्ध साहित्यिक, पुणे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शैलेश राजमाने, नायब तहसीलदार, जालना यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऋष्धिर अंभोरे व वैशाली फोके करणार असून आभार प्रा. बाबुराव नागरगोजे मानणार आहेत.
आयोजकांचे आवाहन :साहित्यप्रेमी, कवी, लेखक, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पहिल्या ‘अक्षरवैभव साहित्य संमेलनाचा’ लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

