काम इस्टिमेट व मोजमापानुसार झाले नसल्याचा मनसेचा आरोप; चौकशी पूर्ण होईपर्यंत देयके अदा न करण्याची मागणी
पैठण | प्रतिनिधी
पैठण शहरातील शासकीय धान्य भंडार परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेचे पैठण शहराध्यक्ष नितीन कुंडलिकराव शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पैठण येथील उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, शासकीय धान्य भंडार परिसरात पावसाळ्यात अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामीण भागातील रास्त धान्य दुकानांशी संबंधित वाहतूक व इतर अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम नियोजित करण्यात आले आहे. मात्र, सध्या सुरू असलेले काम अंदाजपत्रक (इस्टिमेट) व मोजमापानुसार झाले नसल्याचा आरोप मनसेने निवेदनातून केला आहे.
कामाच्या ठिकाणी खोदाई व दबाई केल्यानंतर आवश्यक मुरूम टाकण्यात आला नसल्याचे तसेच मोजमापानुसार सोलिंग करण्यात आले नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची मेरी प्रा. लि., नाशिक या त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशी होईपर्यंत देयके रोखण्याची मागणी
संबंधित कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराला कोणतीही देयके अदा करू नयेत, अशी मागणी मनसेने केली आहे. कामाची तांत्रिक तपासणी करून प्रत्यक्ष काम आणि मंजूर अंदाजपत्रक व मोजमाप यांची पडताळणी करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणी आवश्यक कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष नितीन शेळके यांनी निवेदनातून दिला आहे. आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता, छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आल्या आहेत.
