अविश्वास प्रस्तावावर चर्चा व मतदानासाठी बोलावलेल्या विशेष सभेला प्रस्ताव दाखल करणारे संचालक अनुपस्थित; बाजार समितीतील घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष
प्रतिनिधी | गजानन माळकर पाटील
मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ए. जे. बोराडे आणि उपसभापती गोपाळराव बोराडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव विशेष सभेत प्रस्ताव दाखल करणारे संचालक अनुपस्थित राहिल्याने बारगळला. त्यामुळे दोन्ही पदांवर ए. जे. बोराडे आणि गोपाळराव बोराडे कायम राहिले.
बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुकेशनी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे संचालक या सभेला उपस्थित न राहिल्याने प्रस्तावावरील प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. या सभेला सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे आणि संचालक संतोष वरकड उपस्थित होते.
सभापती व उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर बाजार समितीतील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले होते. प्रस्ताव बारगळल्याने सध्याचे सभापती आणि उपसभापती पदावर कायम राहिले आहेत. या घडामोडीमुळे बाजार समितीतील सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या घडामोडीत माजी आमदार राजेश राठोड, गोपाळराव बोराडे, ॲड. पंकज बोराडे, केशव महाराज सरकटे, संतोष वरकड आणि बाजार समितीच्या संचालकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ए. जे. बोराडे यांची विरोधकांवर टीका
अविश्वास प्रस्ताव बारगळल्यानंतर सभापती ए. जे. बोराडे यांनी विरोधकांवर टीका केली. बाजार समितीतील वर्चस्वामुळे भाजपकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हा जनतेच्या आशीर्वादाचा विजय असल्याचे सांगत योग्य वेळी भाजपला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकरी विकास केंद्रस्थानी ठेवणार : गोपाळराव बोराडे
उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे म्हटले. या प्रयत्नात विरोधकांना अपयश आले असून, हा सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीच्या कामकाजात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडीनंतर मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी कामकाजाकडे आणि राजकीय हालचालींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

