जनता दरबारात आ. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते मानमोडी व मन्यारवाडी येथील दिव्यांगांना प्रमाणपत्रे प्रदान
प्रतिनिधी : मदन भुसारे
गेवराई : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप गेवराई येथील कृष्णाई परिसरात आयोजित जनता दरबारात करण्यात आले. मानमोडी व मन्यारवाडी येथील दिव्यांग बांधवांना आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. या प्रमाणपत्रांमुळे पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे मानमोडी व मन्यारवाडी येथील दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला.
शिवछत्र परिवाराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रमाणपत्रांचे वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी शिवछत्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

