काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांचा पैठण नगर परिषद प्रशासनाला इशारा; प्रभाग ९, १०, ११ व १२ मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिनिधी : हुजैफा बोहरी
पैठण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नवनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेली नवीन पाण्याची टाकी तातडीने कार्यान्वित करून प्रभाग क्रमांक ९, १०, ११ आणि १२ मधील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पैठण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांनी केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास २७ नोव्हेंबर २०२६ पासून नगर परिषद कार्यालयासमोर नागरिकांसह आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात कट्यारे यांनी १२ नोव्हेंबर रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांना अंतिम निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, नवनाथ मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम तसेच भरणा वाहिनीचे काम पूर्ण झाले असून, टाकीची चाचणीदेखील यशस्वी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही टाकी अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याने संबंधित चार प्रभागांतील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची बाब कट्यारे यांनी निवेदनातून मांडली आहे.
या प्रश्नासंदर्भात यापूर्वीही कट्यारे यांनी अन्य चार नगरसेवकांसह आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी एका महिन्याच्या आत पाण्याची टाकी सुरू करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रश्नाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले होते.
मात्र, यापूर्वी दिलेल्या आश्वासनानंतरही टाकी सुरू झाली नसल्याचे कट्यारे यांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधित प्रभागांतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी
नवनाथ मंदिर परिसरातील पाण्याची टाकी कार्यान्वित करण्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही कट्यारे यांनी केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या अंतिम निवेदनाच्या प्रती खासदार डॉ. कल्याणराव काळे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास बापू भुमरे आणि पैठण पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.
२७ नोव्हेंबरपर्यंत पाण्याची टाकी सुरू न झाल्यास नागरिकांसह नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असे कट्यारे यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.
आता या निवेदनाची नगर परिषद प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते आणि संबंधित प्रभागांतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

